‘अलबेला’संगीतकार सी रामचंद्र – शताब्दी अभिवादन

EVENT DETAILS

  • START DATE: 2018-10-02
  • START: 10:00 AM
  • END DATE: 2018-10-02
  • END: 07:00 PM
  • LOCATION: Savarkar sankul ,shivaji Park

ORGANIZER'S DETAILS

  • ORGANIZED BY: CBD Foundation
  • EMAIL : cbdfoundationmumbai@gmail.com
  • PHONE NO: 09820106500

रामचंद्र नरहर चितळकर म्हणजेच सी. रामचंद्र हे चित्रपट संगीत क्षेत्रातील एक दिग्गज. त्यांच्या अनेक सुमधुर रचना आजही आपल्याला मंत्रमुग्ध करतात. त्यांची जन्मशताब्दी साजरी करण्यासाठी शुक्रवार, ३० मार्च २०१८ रोजी ही सुरेल मैफल आयोजित करण्यात आली होती. सर्वच रसिकांनी यासाठी ‘सीबीडी फाऊंडेशन’ला धन्यवाद दिले. सी. रामचंद्र यांच्या जीवनातील अनेक प्रसंग हे निवेदन ऐकताना उपस्थितांच्या डोळ्यासमोर उभे झाले.  

“धीरे से आजा री अखियन में” ही भारतीय संगीतातील अप्रतिम लोरी आहे. अशी लोरी आजपर्यंत झाली नाही. अनेक संगीतकारांनी अशी लोरी करण्याचा खूप प्रयत्न केला, पण ते आसपास सुद्धा पोहोचू शकले नाहीत, असे उद्गार ज्येष्ठ संगीतकार आनंदजी यांनी ‘अलबेला संगीतकार’ म्हणून प्रसिद्ध असलेले रामचंद्र नरहर चितळकर उर्फ सी.  रामचंद्र यांची संगीत क्षेत्रातील महानता रसिकांसमोर मांडताना व्यक्त केले.

‘झी 24 तास’ या आघाडीच्या वृत्तवाहिनीचे मुख्य संपादक विजय कुवळेकर, सी. रामचंद्र यांची भाची मीना निमकर, प्रसिद्ध अभिनेते संजय मोने, ज्येष्ठ दिग्दर्शक राज दत्त आणि संगीतकार अशोक पत्की आदी अनेक मान्यवर या कार्यक्रमास हजर होते. सुमारे अडीच तास चाललेल्या या संगीत सुरांजलीत श्रोते न्हाऊन निघाले.

आनंदजी म्हणाले, आम्ही गुजराती असलो तरी गिरगावात राहून आम्हाला मराठीची चांगली ओळख झाली होती. हिंदी सिनेसृष्टीतील संगीतात मराठीचा झेंडा रोवणारे पहिले संगीतकार होते सी. रामचंद्र. त्यांनी ११० हिंदी चित्रपटांना संगीत दिले.  संगीतातील अनेक नवनवीन संकल्पना सर्वप्रथम बॉलिवूडमध्ये त्यांनी आणल्या. त्यांचा आम्हाला पुढे खूप फायदा झाला. त्यांच्या संगीताने अजरामर झालेला मास्टर भगवान यांचा ‘अलबेला’ हा चित्रपट मी त्या काळी बारा ते पंधरा वेळा पाहिला, तो केवळ सी. रामचंद्र यांनी संगीतबद्ध केलेली गाणी ऐकण्यासाठी. वडिलांनी रात्री दहानंतर सिनेमा चित्रपट पाहण्यावर बंदी घातली नसती तर मी हा ‘अलबेला’ किमान पन्नास वेळा तरी पाहिला असता, अशा शब्दात आनंदजी यांनी रामचंद्र यांना मानवंदना दिली.

भारतातील एक ज्येष्ठ चित्रपट संग्राहक डॉक्टर प्रकाश जोशी यांच्या कल्पनेतून साकार रचनाबंधातून सी. रामचंद्र यांची अनेक बहारदार गाजलेली गाणी निवडण्यात आली होती. ती त्याच थाटात सादर झाली.  ‘मेरी जान संडे के संडे,’ ‘मेरे पिया गए रंगून,’ ‘भोली सूरत दिल के खोटे’ अशा अफलातून गाण्यांवर रसिकही ताल धरू लागले. सुप्रसिद्ध गायक डॉक्टर राहुल जोशी, संपदा गोस्वामी आणि अलिफिया शेट्टी यांनी ही गाणी गाईली. निवेदन खुद्द डॉक्टर प्रकाश जोशी आणि धनश्री प्रधान-दामले यांनी केले.  अखेर ‘ऐ मेरे वतन के लोगो’ या गीताची कहाणी ऐकवून आणि हे अजरामर गीत गाऊन या अभूतपूर्व कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. सी. रामचंद्र यांच्या सदाप्रसन्न रचना प्रवीण फाटक यांच्या कुशल वाद्यवृंदाने पुन्हा जिवंत केल्या.

या कार्यक्रमाला एवढी गर्दी झाली की रसिकांनी सावरकर सभागृहातील पायर्‍यांवर बसून कार्यक्रम ऐकण्याची तयारी दर्शवली. ‘ सीबीडी फाऊंडेशन’चा हा आठवा कार्यक्रम तशाच दर्जेदार भव्य स्वरूपात सादर झाला.  गर्दीमुळे अनेक रसिकांना निराश होऊन परतावे लागले, कारण ही मैफल सुरू होण्यापूर्वीच सावरकर संकुल सभागार भरून गेले होते. हाच कार्यक्रम पुन्हा एकवार सादर करावा अशी विनंती त्यामुळे अनेक श्रोत्यांनी केली. आगामी काळातही असेच सरस कार्यक्रम सादर करण्याची हमी सी.बी.डी. फाऊंडेशनतर्फे या प्रसंगी देण्यात आली.

‘सीबीडी फाऊंडेशन’ची अशी ही थोडक्यात वाटचाल.

वेगळ्या पठडीतील विविध दर्जेदार कार्यक्रम विचक्षण प्रेक्षकांसाठी विनामूल्य सादर करण्याचे ब्रीद ‘सीबीडी फाऊंडेशन’ने प्रत्यक्षात आणून दाखवले आहे. या वाटचालीत असंख्य भलेबुरे अनुभव आले. मात्र रसिकांची मिळालेली पावती सर्वात मोठी आहे. ‘तुमचा पुढचा कार्यक्रम कधी आहे आणि काय आहे’ अशी विचारणा होते तेव्हा आम्हा तिघांना कृतकृत्य झाल्याचे समाधान प्राप्त होते.