तुकाराम ते तुकाराम
EVENT DETAILS
- START DATE: 2012-11-03
- START: 10:30 am
- END DATE: 2012-11-03
- END: 05:00 pm
- LOCATION: Shivaji Park , Dadar ,Mumbai
ORGANIZER'S DETAILS
- ORGANIZED BY: CBD Foundation
- EMAIL : cbdfoundationmumbai@gmail.com
- PHONE NO: 09820106500
भारतीय सिनेसृष्टीचे जनक दादासाहेब फाळके, महान गायिका लता मंगेशकर, थोर निर्माते-दिग्दर्शक व्ही. शांताराम आदी मराठी महानुभवांच्या योगदानाला सलाम करतानाच असंख्य ज्ञात-अप्रसिद्ध मराठी कलाकार, तंत्रज्ञ, वेशभूषाकार आणि इतर रंगकर्मी यांचेही स्मरण ठेवणे चित्रपटसृष्टीच्या २०१३ या शतक महोत्सवी वर्षात उचित ठरणार होते. विष्णुपंत पागनीसांचा तुकाराम ते थेट अलीकडचा जीतेंद्र जोशींचा तुकाराम असा साधारणपणे मराठी बोलपटाचा प्रवास धरल्यास या बहुतांश प्रवासाचा संक्षिप्त आढावा आम्ही घेऊ शकणार असल्याने या कार्यक्रमाला ‘तुकाराम ते तुकाराम’ असे दिलेले शीर्षक सर्वांना आवडले.
महाराष्ट्राचे राज्यपाल के. शंकरनारायणन यांच्या उपस्थितीत हा दिमाखदार सोहळा झाला. या प्रसंगी भारतीय चित्रपट सृष्टी विविध प्रकारे समृद्ध करणारे स्त्री-पुरुष कलाकार आणि चित्रकर्मी किंवा ते हयात नसल्यास त्यांचे कुटुंबीय यांना निमंत्रित करण्यात आले होते. प्रख्यात अभिनेत्री सीमा देव, सुलोचना दीदी, दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर, शुभा आणि विजू खोटे, किरण शांताराम अशा शंभरहून अधिक मान्यवरांची उपस्थिती त्यास लाभली. या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे अशा प्रकारे भारतीय चित्रपट सृष्टीतील मराठी योगदान उजागर करण्याचा उपक्रम प्रथमच झाला. भारतीय चित्रपट सृष्टीच्या वाटचालीतील मराठी कामगिरी लक्षणीय असूनही तोपर्यंत या पैलूला न्याय देण्यात आला नसल्याने ‘सीबीडी फाऊंडेशनने ‘तुकाराम ते तुकाराम’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून अशी आदरांजली अर्पण केली.
अशा प्रकारे ‘तुकाराम ते तुकाराम’ हा “सीबीडी फाउंडेशन”चा पहिलाच कार्यक्रम शिवाजी पार्क येथे सावरकर संकुलातील देखण्या सभागृहात ३ नोव्हेंबर २०१२ रोजी सादर झाला. या कार्यक्रमास महाराष्ट्राचे तत्कालीन राज्यपाल के. शंकरनारायणन येणार असे ठरल्यावर बाकी प्रश्न सहज सुटत गेले.चित्रपट संगीत हा या कार्यक्रमाचा आत्मा राहणार होता. सुमारे साडेतीन तास रसिकांच्या अलोट गर्दीत सीबीडी फाउंडेशनचा हा पहिला कार्यक्रम अत्यंत यशस्वी झाला. लोकप्रिय कलाकार तुषार दळवी आणि मुक्ता बर्वे यांनी त्याचे सूत्र संचलन केले. मराठी-हिंदी चित्रपटसृष्टीतील आघाडीचे संगीतकार अविनाश-विश्वजीत होते संगीत संयोजक. विभावरी आपटे आणि मंदार आपटे या प्रख्यात गायकांनी उत्तम गायन केले. दिग्दर्शन चंद्रकांत कुलकर्णी यांचे होते. दादासाहेब फाळके यांचे नातू चन्द्रशेखर पुसाळकर या प्रसंगी खास सपत्नीक निमंत्रित होते. हिंदीतील दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर,चित्रपती व्ही शांताराम यांचे चिरंजीव किरण शांताराम आदींची उपस्थिती या कार्यक्रमास लाभली होती.
या कार्यक्रमास अनेक संस्थांनी भरघोस पाठिंबा दिला. तत्कालीन मंत्री गणेश नाईक, भारतीय आयुर्विमा महामंडळाचे सचिव देवकीनंदन मुकादम आणि कॉसमॉस बँकेचे तत्कालीन उपाध्यक्ष मधुकर अत्रे यांचा या संदर्भात विशेष उल्लेख करावा लागेल. अनेक इतरांच्या मदतीमुळे आम्ही हा शानदार कार्यक्रम रसिकांना विनामूल्य सादर करू शकलो. या कार्यक्रमात काहीही न्यून राहू नये यासाठी आम्ही प्रचंड मेहनत घेतली. हा कार्यक्रम नंतर ‘झी २४ तास’ या वाहिनीने प्रक्षेपित केला. त्यामुळे ‘सीबीडी फाऊंडेशन’ सर्वांना माहित झाले.