सैननकहो तुमच्यासाठी

EVENT DETAILS

  • START DATE: 2013-10-25
  • START: 10:30 am
  • END DATE: 2013-10-25
  • END: 07:40 pm
  • LOCATION: Shivaji Park

ORGANIZER'S DETAILS

  • ORGANIZED BY: STILLIDEA
  • EMAIL : cbdfoundationmumbai@gmail.com
  • PHONE NO: 09820106500

आपल्या सीमांचे अहोरात्र रक्षण करणारा आपला प्रत्येक भारतीय सैनिक स्वत:चे प्राण तळहातावर ठेवून सर्वोच्च त्यागाला प्रत्येक क्षणी सज्ज असतो, पण शांततेच्या काळात आपल्याला लष्कर आठवते का?

या शूरवीर भारतीय सैनिकाचे स्मरण करण्यासाठी, त्याला वंदन करण्यासाठी ‘सीबीडी फाऊंडेशन’ने २५ ऑक्टोबर २०१३ रोजी “सैनिकहो, तुमच्यासाठी” हा कृतज्ञता समारंभ आयोजित केला होता. इंग्लंड, अमेरिका, रशिया, जपान आणि इतर अनेक राष्ट्रांमध्ये प्रत्येक लष्करी जवान समाजाचा अत्यंत आदरणीय घटक समजण्यात येतो. त्याला प्रतिष्ठेची वागणूक देण्यात येते. समाजाचे प्रेम, सन्मान मिळत असल्याने तरुण वर्ग लष्करात प्रवेश करतो, मातृभूमीसाठी कोणताही पराक्रम करण्यास तत्पर असतो.

हे आपल्याकडेही घडायला पाहिजे या भावनेतून “सैनिकहो, तुमच्यासाठी” या कार्यक्रमाच्या माध्यमातून ‘सीबीडी फाऊंडेशनने हे पाऊल उचलले. सैनिकांचे स्मरण सार्वत्रिक, सतत, सदासर्वदा संपूर्ण समाजाने कृतज्ञतेच्या भावनेतून करावे हे त्यामागील उद्दिष्ट. येणार्‍या प्रत्येक सणापासून प्रत्येक मंगल प्रसंगी, प्रत्येक समारंभाला आपण लष्कराचे स्मरण करावे, इतरांनाही त्यासाठी प्रेरणा द्यावी असे नम्र आवाहन करण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन केलेले होते. हा कार्यक्रम स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृह, शिवाजी पार्क, मुंबई येथे पार पडला. महाराष्ट्राचे जलसंपदा मंत्री आणि रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री श्री. सुनील तटकरे या प्रसंगी सन्माननीय अतिथी म्हणून उपस्थित होते.

रायगड हे अखिल भारतासाठी ज्वाज्वल्य राष्ट्रप्रेमाचे प्रतीक. या जिल्ह्याने लाखो तरुण सैन्यात पाठवले आहेत. सैनिकांना वंदन करण्यासाठी काही सैनिक परिवारांना या प्रसंगी खास निमंत्रित केलेले होते. या अभूतपूर्व कार्यक्रमाला व्हाईस अॅडमिरल (निवृत्त) एम. पी. आवटी, लेफ्टनंट जनरल (निवृत्त) दत्तात्रय शेकटकर, एअर मार्शल (निवृत्त) भूषण गोखले तसेच अनेक आजी माजी लष्करी अधिकारी, जवान आणि त्यांचे कुटुंबीय हजर राहिले.

या कार्यक्रमाचा एक परमोच्च बिंदु म्हणजे श्रीमती लीना कॅस्टेलिनो यांना देण्यात आलेली मानवंदना. त्यांचे सुपुत्र विंग कमांडर डॅरिल कॅस्टेलिनो यांनी त्या वर्षी उत्तराखंडात अतिवृष्टीमुळे अडकून पडलेल्या अनेक भाविकांची सुटका आपल्या प्राणाची पर्वा न करता थरारक शौर्य दाखवले होते. या मोहिमेतील एक उड्डाण करत असतानाच ते शहीद झाले होते. श्रीमती लीना व्यासपीठावर आल्या तेव्हा सावरकर सभागृहात उपस्थित असलेल्या प्रत्येकाचे डोळे पाणावले होते तर छाती अभिमानाने भरून आली होती. या नंतर व्हाईस अॅडमिरल आवटी, लेफ्टनंट जनरल शेकटकर आणि एअर मार्शल गोखले या ज्येष्ठ लष्करी

वीरांच्या हस्ते विविध सैनिकी परिवारांचा हृद्य गौरव करण्यात आला. सूत्र संचालन तुषार दळवी आणि अमृता सुभाष यांनी केले. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची मोठी उपस्थिती हे या कार्यक्रमाचे एक वैशिष्ट्य ठरले. त्यांच्या मनात राष्ट्रभक्तीचा स्फुल्लिंग चेतवावा, हे ‘सीबीडी फाऊंडेशन’चे उद्दिष्ट सफल झाले.

आवटी यांनी या प्रसंगी अत्यंत सडेतोड भाषण केले. ते म्हणाले, “सीमेवर आपल्या जीवाची पर्वा न करता रक्षण करणारे, थंडी-वारा-ऊन- पावसात २४ तास शत्रूवर नजर ठेवून खडा पहारा देणारे जवान शत्रूशी दोन हात करीत जखमी होतात तर कधी देशासाठी बलिदान देतात. याविषयी एक सच्चा भारतीय म्हणून आपल्याला खरच कळकळ वाटते का? सणसमारंभात मश्गुल असणाऱ्या किती जणांना त्यांचे बलिदान लक्षात राहते? मुंबई असो किंवा इतर कुठलीही शहर घ्या, सैनिकांचे एक स्मारकही दिसून येत नाही. याची खरंच खंत वाटली पाहिजे.”

आवटी म्हणाले, “कर्तव्य बजावत असताना देशासाठी हसतमुखाने मृत्यूला सामोरे जाण्यातच खरा सैनिक धन्यता मानतो. असा दुसरा कुठलाही कामधंदा वा व्यवसाय नसेल. कोणा शास्त्रज्ञाला देखील या अद्भुत समाधानाचा शोध घेता येणार नाही.” आपले विचार अगदी स्पष्टपणे मांडताना आवटी गरजले, “देव आणि सैनिक आपल्याला फक्त संकटाच्या वेळेला आठवतात. तणावाची परिस्थिती नसते तेव्हाच देव आणि जवानांचा आदर केला जातो. राजकीय नेत्यांची चौकाचौकात स्मारके उभारताना जवानांची आठवणही न काढणाऱ्या मुंबईकरांनो, थोडातरी विचार करा.”

प्रमुख पाहुणे जलसंपदामंत्री सुनील तटकरे यांनी रायगड जिल्हयामधील जवानांच्या गौरवशाली परंपरेची माहिती दिली. दुसऱ्या महायुद्धात रणभूमीवर उतरलेले श्रीकांत कोटणीस यांचा या कार्यक्रमात गौरव करण्यात आला. देशाच्या कामी आलेले यशवंत घाडगे यांच्या पत्नी लक्ष्मीबाई यांना १९४५ साली भारताचे व्हाइसरॉय लॉर्ड वेव्हेल यांच्या हस्ते सन्मान पदक देण्यात आले होते. त्या सुद्धा या वेळी उपस्थित होत्या. फुली अंबाडी गावातील मानस नाईक, समीर पवार आणि माजी सुभेदार श्रीधर पवार यांचा या कार्यक्रमात खास गौरव करण्यात आला.