महाराष्ट्राचे मानकरी
EVENT DETAILS
- START DATE: 2013-04-30
- START: 10:30 am
- END DATE: 2013-04-30
- END: 07:40 pm
- LOCATION: Ravindra Natyamandir,
ORGANIZER'S DETAILS
- ORGANIZED BY: CBD Foundation
- EMAIL : cbdfoundationmumbai@gmail.com
- PHONE NO: 09820106500
पहिलाच कार्यक्रम यशस्वी झाल्याने आमचा हुरूप वाढला. आम्ही एक अभूतपूर्व महत्वाकांक्षी कार्यक्रम त्यानंतर नियोजित केला. त्याचे शीर्षक होते ‘महाराष्ट्राचे मानकरी.’ ज्यांच्या कर्तृत्वामुळे महाराष्ट्राचे नाव देशात आणि देशाबाहेर झळाळले, अशा विविध क्षेत्रातील काही दिग्गजांना एकाच व्यासपीठावर बोलावून त्यांचा सन्मान करावा, या कल्पनेतून तो स्फुरला. या निवडक मान्यवरांच्या कामगिरीचा सन्मान करण्यासाठी ‘सीबीडी फाऊंडेशन’ने तशाच तोलामोलाच्या दिग्गजांना ‘महाराष्ट्राचे मानकरी’हा सन्मान प्रदान करण्यासाठी निमंत्रित केले होते.
विख्यात खगोलशास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर, अणुशास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर, टाटा स्टीलचे व्यवस्थापकीय संचालक हेमंत नेरुरकर, अष्टपैलू क्रिकेटपटू अजित वाडेकर आणि फलंदाज-समालोचक सुनील गावस्कर आदी आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या मराठी कर्तबगारांना एकाच व्यासपीठावर आणण्याची
किमया ‘सीबीडी फाऊंडेशन’तर्फे मुंबईच्या रवींद्र नाट्यमंदिरामध्ये मंगळवार, ३० एप्रिल २०१३ रोजी घडवण्यात आली. ‘महाराष्ट्राचे मानकरी’ हा सन्मान प्रमुख प्रातिनिधिक मराठी कर्तबगारांना अर्पण करण्याचा हा आनंद सोहळा ओडिसाचे तेव्हा नुकतेच निवृत्त झालेले राज्यपाल मुरलीधर भांडारे, महाराष्ट्राचे सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ आणि विविध दिग्गजांच्या प्रमुख उपस्थितीत साजरा झाला. भांडारे यांना प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहण्याची विनंती आम्ही फार आधी केली होती. त्यांचा होकार आणि कार्यक्रमाचा दिवस या दरम्यान भांडारे निवृत्त झाले होते. मात्र त्यांनाच प्रमुख पाहुणे म्हणून कायम ठेवण्याचा निर्णय आम्ही घेतला.
डॉ. अनिल काकोडकर, आशुतोष गोवारीकर, डॉ. नंदिता पालशेतकर, हेमंत नेरुरकर, सुहास बहुलकर, डॉ. अनंत जोशी, सुनील गावस्कर आणि डॉ. श्रुती सडोलीकर-काटकर यांचा सन्मान या कार्यक्रमात करण्यात आला. त्यांना अनुक्रमे डॉ. जयंत नारळीकर, श्री. मंगेश पाडगावकर, डॉ. नीलिमा क्षीरसागर, सेंट्रल बँकेचे अध्यक्ष श्री. मोहन टांकसाळे, श्रीमती प्रफुल्ला डहाणूकर, डॉ. नंदकुमार लाड, अजित वाडेकर आणि श्रीमती सुमित्रा महाजन यांच्या हस्ते गौरवण्यात आले.
या सन्मान सोहळ्यात रंग भरला पुण्याच्या प्रख्यात कथ्थक नृत्यांगना मनीषा साठे यांच्या नृत्यालयातील कलाकारांच्या नृत्याविष्काराने. मुग्धा वैशंपायन, शमिका भिडे, श्रीरंग भावे यांचे गायन तसेच संगीतकार कमलेश भडकमकर यांच्या संगीत संयोजनातून महाराष्ट्राची लोककला आणि लोकसंगीताचा आस्वाद उपस्थित मान्यवरांनी घेतला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रसिद्ध अभिनेते तुषार दळवी आणि अभिनेत्री अमृता सुभाष यांनी असे केले की कार्यक्रमाची रंगत उत्तरोत्तर वाढत गेली. महाराष्ट्राचे वैभव असे ज्यांचे वर्णन करता येईल अशी संस्मरणीय कामगिरी करणारे हे सारे मानकरी साठे महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. कविता रेगे यांच्या अध्यक्षतेखालील एका समितीने निवडले होते. या समितीत माजी उपमहापौर अरुण देव, लोकप्रिय लेखक कुमार नवाथे आदींचा समावेश होता.
डॉ जयंत नारळीकर आणि डॉक्टर काकोडकर यांची नावे ऐकल्यानंतर मान आदराने लवणार नाही असा भारतीय सापडणे नाही. या दोघांनी उपस्थित राहण्यास होकार दिल्याने सर्व काम सुलभ होत गेले. लोकसभेच्या आताच्या अध्यक्ष आणि तेव्हाच्या खासदार सुमित्रा महाजन यांची उपस्थिती विशेष ठरली. छगन भुजबळ यांनी या मान्यवर सत्कारमूर्तींच्या प्रति मोजक्या शब्दात आदरभाव व्यक्त केला.