अटल रत्न

EVENT DETAILS

  • START DATE: 2015-10-16
  • START: 10:00 AM
  • END DATE: 2015-10-16
  • END: 07:00 PM
  • LOCATION: Ravindra Natyamandir

ORGANIZER'S DETAILS

  • ORGANIZED BY: CBD Foundation
  • EMAIL : cbdfoundationmumbai@gmail.com
  • PHONE NO: 09820106500

श्री. अटल बिहारी वाजपेयी यांच्यातला माणूस, त्यांचे राष्ट्रप्रेम, समर्पण आणि एक आंतरराष्ट्रीय मुत्सद्दी म्हणून त्यांनी केलेले कार्य अशा विविध पैलूंवर आधारित ‘अटल रत्न’ या ‘सीबीडी फाऊंडेशन’ने शुक्रवार १६ ऑक्टोबर २०१५  रोजी रवींद्र नाट्यमंदिरात आयोजित केलेल्या कार्यक्रमात अभिनेता सुबोध भावे आणि अभिनेत्री मधुरा वेलणकर यांनी अटलजींच्या आभाळासारख्या व्यक्तिमत्त्वाचा परिचय करून देणार्‍या अनेक आठवणी कथन केल्या. श्री. वाजपेयी यांना ‘भारत रत्न’ प्रदान करण्याचा औपचारिक कार्यक्रम राष्ट्रपती श्री. प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते दिल्लीत पार पडला. परंतु या निमित्त एकही जाहीर सोहळा झाला नसल्याने वाजपेयी यांना मुंबईकरांच्या वतीने वंदन करावे म्हणून ‘सीबीडी फाऊंडेशन’ने हा कार्यक्रम त्यांच्या कार्याच्या गौरवार्थ करण्याचे ठरविले. श्री. वाजपेयी यांचा ‘भारत रत्न’ हा बहुमान देऊन केलेल्या गौरवानिमित्त आनंद व्यक्त करण्यासाठी हा देशातील असा पहिला कार्यक्रम ठरला.

केंद्रीय महामार्ग, नौकावहन आणि बंदर मंत्री श्री. नितीन गडकरी, ज्येष्ठ अणु शास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर आणि महाराष्ट्राचे गृह निर्माण मंत्री श्री. प्रकाश मेहता हे विशेष पाहुणे अटलजींच्या मनोज्ञ आठवणी सांगण्यात दंग होऊन गेले आणि श्रोतेही या वातावरणात हरवून गेले. अटलजींच्या सहवासाचा लाभ झालेले गडकरी हा साडेतीन तासांचा कार्यक्रम पाहून एवढे प्रभावित झाले की त्याचे ठिकठिकाणी प्रयोग व्हावे, असे त्यांनी सुचवले. अटलजी आणि भारताचा दुसरा अणुस्फोट यांच्याबरोबर निगडित असलेले डॉ. अनिल काकोडकर यांनी अटलजींच्या साधेपणाच्या अनेक आठवणी सांगून उपस्थितांना चकित केले.

लेखक-संपादक विजय कुवळेकर यांची संहिता लाभलेला ‘अटल रत्न’ हा आगळा वेगळा कार्यक्रम म्हणजे काव्य, संगीत, अटलजींचा निरागस विनोद, मराठी प्रेम आणि खंदे देशकारण यांचा अभूतपूर्व संगम होता. कमलेश भडकमकर यांच्या संगीताने नटलेल्या अटलजींच्या निवडक कविता हृषिकेश रानडे, मुग्धा वैशंपायन आणि शमिका भिडे या गायकांनी गाऊन उपस्थितांना भारावून टाकले.