सलाम पोलीस

EVENT DETAILS

  • START DATE: 2014-02-19
  • START: 10:00 AM
  • END DATE: 2014-02-19
  • END: 07:00 PM
  • LOCATION: Yashwantrao chavhan center, Nariman Point

ORGANIZER'S DETAILS

  • ORGANIZED BY: CBD Foundation
  • EMAIL : cbdfoundationmumbai@gmail.com
  • PHONE NO: 09820106500

पोलिस आणि हेटाळणी, पोलिस आणि थट्टामस्करी, पोलिस खात्याबद्दल तिरस्कार आणि संताप या भावना सामान्यपणे एकत्र आढळतात. मात्र तरीही रस्त्यावर पोलिस दिसला की आपल्याला बरे वाटते.

प्रसंगी जीव धोक्यात घालून हा पोलिस आपले रक्षण करत असतो. तरीही या नकारात्मक भावना का निर्माण होतात? हे आणि असे अनेक प्रश्‍न आपल्या मनात येत असतात. पण त्यांना वाट करून देणे आपणास शक्य होत नाही. कारण काहीही असो. तथापि केवळ आपल्यालाच हे प्रश्‍न सतावत असतात असेही नाही. जवळपास सर्वांच्याच मनात ते असतात. त्यांना वाचा फोडण्यासाठी, तज्ञ लोकांना त्यावर बोलण्यासाठी, शक्य झाल्यास परिस्थिती बदलण्यासाठी ‘सीबीडी फाऊंडेशन’ने एक अभिनव उपक्रम सादर केला. त्याचे नाव ‘सलाम पोलिस’.

पोलिस आणि विविध समाजघटक जवळ यावेत, पोलिस दलाबद्दल समाजाची आत्मीयता दृढ व्हावी अशी ‘सीबीडी फाऊंडेशन’ची भूमिका आहे. “सलाम पोलिस” हा कार्यक्रम म्हणजे पोलिस दल आणि आपण यांच्यात संवाद घडवून आणायचा एक प्रयत्न. असे प्रयत्न सर्व स्तरांवर व्हायला हवेत, अशी ‘सीबीडी फाऊंडेशन’ची भावना आहे.

“सलाम पोलिस” हा अनोखा कार्यक्रम बुधवार, १९ फेब्रुवारी २०१४ रोजी मुंबई येथे यशवंतराव चव्हाण सेंटर, नरीमन पॉइंट येथे सादर झाला. या प्रसंगी मुंबईचे सह पोलिस आयुक्त श्री. सदानंद दाते, भारतीय गुप्तचर विभागाचे माजी सहसंचालक श्री. भीष्मराज बाम, ज्येष्ठ न्यायमूर्ती डॉ. एस. राधाकृष्णन आणि प्रसिद्ध अभिनेते श्री. शिवाजी साटम यांची भाषणे झाली. ‘पोलिसांची रुपेरी पडद्यावरील प्रतिमा’ हे दृकश्राव्य सादरीकरण प्रारंभी चित्रपट संग्राहक श्री. अरुण पुराणिक यांच्या सहकार्याने सादर झाले. श्री. अंबरीश मिश्र यांनी या कार्यक्रमाचे सूत्र संचालन केले.

या कार्यक्रमास नव्याने पोलिस दलात दाखल झालेले जवान मोठ्या संख्येने हजर राहिले. श्री. दाते यांचे भाषण त्यांच्यासाठी अत्यंत मोलाचे ठरले. आपली कारकीर्द कशी समाजोपयोगी करावी आणि आपले आरोग्य कसे सांभाळावे. याचा वस्तुपाठ म्हणता येईल असे हे विवेचन होते. एसीपी प्रद्युम्न ही छोट्या पडद्यावरील भूमिका साकार करणारे श्री. शिवाजी साटम यांची श्री. पुराणिक यांनी घेतलेली मुलाखत सतत टाळ्या घेऊन गेली. पोलिस दलासाठी सरकारने काय करावे, याचे मार्गदर्शन न्यायमूर्ती राधाकृष्णन यांनी केले. ‘सीबीडी फाऊंडेशन’ने हा कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.